Contact Banner

भुसावळ येथे मरिमातेची आज यात्रा; जळगाव रोड दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

 



भुसावळ येथे मरिमातेची आज यात्रा; जळगाव रोड दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

भुसावळ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात मरिमातेची पारंपरिक व ऐतिहासिक यात्रा आज (दि. १९) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या यात्रेनिमित्त जळगाव रोडवरील वाहतूक दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बारांगड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा सायंकाळी ६ वाजता सुरू होणार असून, गुलालबारी परिसरातून मरिमाता मंदिरापर्यंत ही यात्रा निघणार आहे. यात्रेसाठी मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली असून, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा या यात्रेचा मान मयूर भोळे यांना मिळाला असून, बगाडे म्हणून राहुल पाटील व दुर्गेश पाटील कार्य पाहणार आहेत.

यात्रेमुळे जळगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. विशेषतः जड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारांगड्यांवर बसणाऱ्या युवकांना ओळख पटावी यासाठी विशिष्ट रंगाचे टी-शर्ट देण्यात आले असून, सेवेकऱ्यांनाही वेगळी ओळख देण्यात आली आहे.

बससेवा तात्पुरती बंद

यात्रेनिमित्त यावल, रावेर व चोपडा या मार्गावरील बससेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जळगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंत भुसावळ–यावल बससेवा गांधी पुतळ्यापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

यात्रेदरम्यान शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.