Contact Banner

बोरी (उरण) येथे नागरी संरक्षण दलाचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीर यशस्वी संपन्न

 

bori-uran-nagari-sanrakshan-dal-prathamik-prashikshan-shibir-yashasvi-sampann

बोरी (उरण) येथे नागरी संरक्षण दलाचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीर यशस्वी संपन्न

उरण : सुनील ठाकूर-

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण दल, उरण (जि. रायगड) यांच्या वतीने आयोजित नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रम प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले. दि. १२ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित या पाच दिवसीय प्रशिक्षणात स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे व पायऱ्या, हवाई हल्ला सूचना प्रणाली, नागरी संरक्षण सेवा व संघटनात्मक रचना, आगीचे प्रकार व प्रतिबंधक उपाय, दोर व गाठींचे विविध प्रकार, आपत्कालीन विमोचन पद्धती यांसह बँडेजचे प्रकार आणि बांधण्याच्या योग्य पद्धती यांचा समावेश होता. तसेच श्वासावरोध झाल्यास कृत्रिम श्वसन देण्याची पद्धत, पाण्यात बुडालेल्या, धुराच्या खोलीत अडकलेल्या किंवा विद्युत धक्का बसलेल्या बेशुद्ध व्यक्तींना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

याशिवाय मानसिक व शारीरिक ताणतणाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच हृदयविकाराच्या प्रसंगी त्वरित मदत कशी करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या काळात नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांनी नागरिकांना कशा पद्धतीने मदत करावी, त्यांचे मनोबल कसे टिकवून ठेवावे याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय क्षेत्ररक्षक हरेश्वर ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाट, सक्रिय स्वयंसेवक दौलत पाटील यांच्यासह दत्ताराम गोंधळी (उपमुख्य क्षेत्ररक्षक), समीर थळी, नितेश घरत, भूमी मोकल, उत्कर्षा गावंड, रेशम कोळी, कांशिता म्हात्रे, आयुष मोहिते, शुभम वीर, गौरव डांगे, मनाली पाटील, भाविक पाटील, प्रतीक तांडेल, यशश्री राव, मानसी वर्तक, वैष्णवी वर्तक, समीक्षा ठाकूर आणि पेण तालुक्यातील राजेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन करून स्वयंसेवकांना नागरी संरक्षण दलाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.

या प्रशिक्षणामुळे स्वयंसेवक अधिक सक्षम होऊन आपत्ती व्यवस्थापनात प्रभावी भूमिका पार पाडतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.