Contact Banner

एकही बाधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये – जि.प. सदस्य पुष्पा काळे यांचे प्रशासनाला निर्देश

 


ekahi-badhit-shetkari-nuksan-bharpai-pasun-vanchit-rahu-naye-zip-sadasya-pushpa-kale-nirdesh


एकही बाधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये – जि.प. सदस्य पुष्पा काळे यांचे प्रशासनाला निर्देश

सोयगाव (प्रतिनिधी):सोयगाव तालुक्यासह परिसरात दि. १८ रोजी झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागा आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांनी शुक्रवारी बाधित भागांची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

सोयगाव-जरंडी मंडळातील जरंडी, निंबायती, धिंगापूर, कंकराळा आदी गावांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या पथकासमवेत त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एकही बाधित शेतकरी पंचनाम्यातून किंवा नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये. तसे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नुकसान भरपाईची रक्कम वसूल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सलग दोन वेळा झालेल्या गारपिटीमुळे केळी, कांदा, गहू, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ आणि अचूक पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार मनीषा मेने यांना दिल्या.

या पाहणीदरम्यान तहसीलदार मनीषा मेने, तेजस्विनी ताई काळे, मंडळ अधिकारी अरुण पंडित, उपकृषी अधिकारी समाधान चौधरी, सहायक कृषी अधिकारी दत्ता मुठाळ, ग्राम महसूल अधिकारी अंकुश चव्हाण, विकास राऊत, ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, योगेश सपकाळ यांच्यासह भाजप जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे, ईश्वर क्षीरसागर, राजू पाटील, कृषिभूषण रवींद्र पाटील, विशाल गिरी, धनसिंग राठोड, पूनम चव्हाण, लाला वाघ, प्रकाश पवार, अनिल माळी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.