धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराचा झटका; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराचा झटका; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
यावल (प्रतिनिधी) : शहरात धावत्या दुचाकीवर असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर–बुर्हाणपूर राज्य मार्गावरील जुना चोपडा नाका परिसरात ही घटना घडली. महेश संतोष येवले (वय ३२, रा. शिवाजीनगर, यावल) हे शेतातून काम आटोपून दुचाकीने शहराकडे येत होते. दरम्यान, धावत्या दुचाकीवर असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर कोसळले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरातील काही तरुणांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेतील महेश येवले यांना उचलून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. डॉ. तुषार सोनवणे यांनी प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
ही घटना रविवारी दुपारी घडली असून याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे येवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महेश येवले हे कुटुंबाचे आधारस्तंभ असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, रोशन येवले, बापू जासूद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, या घटनेमुळे तरुण वयात वाढत्या हृदयविकाराच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य तपासणी व योग्य जीवनशैली अवलंबण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत