वरिष्ठ महाविद्यालयीन सकल राजपूत प्राध्यापक परिवार संमेलन उत्साहात संपन्न
वरिष्ठ महाविद्यालयीन सकल राजपूत प्राध्यापक परिवार संमेलन उत्साहात संपन्न
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-“स्वार्थ बाजूला ठेवून समाजहिताला प्राधान्य देत सर्व घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. समाजहित सर्वतोपरी हे ब्रीद अंगीकारून संघटन बळकट केले पाहिजे,” असे प्रतिपादन जैन इरिगेशन सिस्टीमचे व्हॉइस प्रेसिडेंट तथा जागतिक कीर्तीचे केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
ते श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथे आयोजित वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह राज्यस्तरीय द्वितीय शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या वेळी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर इंगळे (नागपूर) यांच्यासह निर्मल सीड्स पाचोरा येथील संचालक व शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जे. सी. राजपूत, प्राचार्य डॉ. शंकरसिंह राजपूत (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), प्राचार्य डॉ. महेंद्रसिंह रघुवंशी, डॉ. संजय शेखावत (अधिष्ठाता, रायसोनी ग्रुप), प्राचार्य डॉ. उदय जगताप (अध्यक्ष, आयोजन समिती), उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पवार, प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पाटील यांसह राज्यभरातील प्राध्यापक, प्राचार्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी प्रास्ताविकातून संमेलनामागील उद्दिष्टे स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. के. बी. पाटील यांनी भूत, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत समाजाची भावी दिशा स्पष्ट केली. शिक्षण व मार्गदर्शनाच्या माध्यमातून समाज संघटन बळकट करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य, सेंद्रिय शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि हरित ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील यांनी माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला तसेच विद्याभारती व एसएसबीटी संस्थांचा परिचय करून दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमात प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी सरस्वती वंदना सादर केली, तर “पधारो म्हारो देस” या गीताने उपस्थितांची मने जिंकली. सौ. अलकनंदा रमेश परिहार यांनी रांगोळीतून महाराणा प्रताप यांचे आकर्षक चित्र साकारले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. सुधाकर इंगळे यांनी “बंधुप्रेम, स्नेह आणि करुणा या मूल्यांवरच कोणतेही संघटन टिकते,” असे सांगत समाज संघटनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच अशा संमेलनांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ. नरसिंह परदेशी (बघेल) यांनी “राजपुतांचा समृद्ध इतिहास” या विषयावर दृकश्राव्य सादरीकरणातून अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी इतिहासातील दुर्लक्षित घटना व शौर्यगाथा उलगडून दाखवत खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
यानंतर राज्यभरातून आलेल्या प्राध्यापकांचा परिचय, स्वागत व सन्मान सोहळा पार पडला. अशा संमेलनांमुळे प्राध्यापकांमध्ये सुसंवाद वाढून समाज संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सकल राजपूत प्राध्यापक समाज यांच्या आयोजन समितीने परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत