Contact Banner

प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण; पाच जण अटकेत

 

premvivahachya-vadatun-tarunala-vivastra-karun-amanush-marhan-pach-jan-atket

प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण; पाच जण अटकेत

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून एका तरुणाला विवस्त्र करून खांबाला बांधत लोखंडी रॉड व दांड्याने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण व तरुणी यांनी १८ मार्च रोजी येथे प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली होती. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी या विवाहाला तीव्र विरोध दर्शवत सूडभावनेतून २० मार्च रोजी तरुणाला त्याच्या मामाच्या घरी बोलावून घेतले.

तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांनी तरुणाला पकडून विवस्त्र केले व खांबाला बांधून लोखंडी रॉड, काठ्या व दांड्याने बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी त्याला दुचाकीवरून गावात फिरवत पुन्हा मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, तरुणाच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकरणी कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोटम पाटील (५२), हरीश महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बडे (६१) या पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रेमविवाहाच्या कारणावरून घडलेली ही अमानुष घटना समाजात संतापाची लाट निर्माण करणारी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.