गालबोट -‘बारा गाड्या’ खाली येऊन एकाचा मृत्यू
गुढीपाडव्याच्या ‘बारा गाड्या’ यात्रा कार्यक्रमात भीषण अपघात; एकाचा मृत्यू
भुसावळ (लेवाजगत न्यूज) – तालुक्यातील सुनसगावजवळील गोजोरा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मरी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक ‘बारा गाड्या’ कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ रोजी सायंकाळी चोरवड–गोजोरा रस्त्यावर या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘बारा गाड्या’ ज्ञानेश्वर सोनवणे हे ओढत होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक गर्दीतून पुढे आलेले अशोक बाबुराव कोळी (वय ५७) हे चौथ्या व पाचव्या गाडीखाली आल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर उपस्थितांनी तात्काळ अशोक कोळी यांना भुसावळ येथील डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत अशोक कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुले व मुलगी असा परिवार असून ते मनमिळाऊ स्वभावाचे होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आजपर्यंत ‘बारा गाड्या’ हा पारंपरिक कार्यक्रम कोणत्याही अपघाताविना पार पडत होता. मात्र यंदा प्रथमच अशी दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत