जरंडीत सराफा दुकान फोडले; पन्नास हजारांचा मुद्देमाल लंपास
जरंडीत सराफा दुकान फोडले; पन्नास हजारांचा मुद्देमाल लंपास
सोयगाव, ता.१९ (बातमीदार): तालुक्यातील जरंडी येथे अज्ञात चोरट्यांनी सराफा दुकान फोडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.१८) मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जरंडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर असलेल्या माऊली ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी करण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सोने-चांदीचे दागिने, बेंटेक्सच्या वस्तू तसेच कटलरी साहित्य असा एकूण सुमारे ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
गुरुवारी सकाळी सुमारे आठ वाजता दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दुकानमालक संदीप विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात तीन ते चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरीनंतर चोरट्यांनी मालाचे रिकामे बॉक्स नांदगाव शिवारातील गट क्रमांक ५६ मध्ये फेकून दिल्याचे गुरुवारी दुपारी निदर्शनास आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बॉक्स ताब्यात घेतले.
या घटनेचा तपास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. मात्र, रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे श्वान पथकाला ठोस दिशा मिळू शकली नाही.
पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर, गजानन दांडगे, अजय कोळी, सादिक तडवी, संजय सिंघम आदी अधिकारी पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत