गुढीपाडवा निमित्त सावद्यात भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात; २४ वर्षांची परंपरा कायम, शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
गुढीपाडवा निमित्त सावद्यात भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात; २४ वर्षांची परंपरा कायम, शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
लेवाजगत न्यूज सावदा : गुढीपाडवा निमित्त श्री स्वामिनारायण मंदिर सावदा यांच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेली भव्य दिव्य शोभायात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.लेवाजगत न्यूज
आज सकाळी भगवंतांच्या आरतीनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीवर गुढी उभारण्यात आली होती. बैलगाडीच्या मध्यभागी आसनस्थ श्री स्वामीनारायण भगवंतांची सुंदर मूर्ती विशेष आकर्षण ठरली.
शोभायात्रेपूर्वी पूजन व आरती सोहळा पार पडला. यावेळी स्वयंप्रकाश दासजी शास्त्री आणि भक्तीप्रिय दासजी शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरत करण्यात आली. तसेच संत मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभली.
ही शोभायात्रा मंदिरापासून सुरू होऊन मोठा आळ, इंदिरा गांधी चौक, धर्मवीर संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, शारदा चौक, रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंजारवाडी कॉर्नर रोड आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात येऊन समाप्त झाली.
शहरातील विविध ठिकाणी या शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरासमोर आणि परिसरात आकर्षक रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता. तसेच अनेकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.
या सोहळ्यात मंदिराचे ट्रस्टी चंद्रशेखर पाटील, डॉ. अजितकुमार पाटील, शिवाजी भारंबे, धनंजय चौधरी, नंदू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते.
शोभायात्रेच्या समारोपावेळी भक्तीप्रिय दासजी शास्त्री यांनी गुढीपाडव्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
या भव्य शोभायात्रेमुळे सावदा शहरात सर्वत्र उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत