हजारो एकविरा देवीच्या भक्तांनी घेतले एकविरा इंद्रायणी माते चे दर्शन..
हजारो एकविरा देवीच्या भक्तांनी घेतले एकविरा इंद्रायणी माते चे दर्शन..
उरण :सुनिल ठाकूर .
कळंबुसरे इंद्रायणी डोंगरावरील पांडवकालीन एकविरा देवीचे जागृत स्थान.एका रात्रीत श्री सुरेश राऊत यांनी कळंबुसरे ग्रामस्थांच्या सहकार्याने एकविरा देवीचे मंदिर उभारले..
या मंदिरावर नवरात्र उत्सव, चैत्र नववी पालखी उत्सव,देवीचा जागरण असे कार्यक्रम देवीचे भक्त सुरेश राऊत भक्ती भावाने साजरा करत असे.त्यांच्या नंतर त्यांचा वारसा त्यांची मुले सुरेंद्र राऊत आणि सुशील राऊत चालवत आहेत.
आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी चैत्र पौर्णिमा आई एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळा कळंबूसरे ग्रामस्थांना सोबत घेऊन मोठया थाटात पार पडला..
पांडवकाळात पांडवांनी एका रात्रीत देऊळ बांधण्याचा केला होता प्रयत्न.
पांडवकालीन जागृत दैवत आई एकविरा देवी ही उरण तालुक्यातील कळंबुसरे परिसरात इंद्रायणीच्या डोंगरावर कार्ल्याची एकविरा देवी म्हणून प्रसिद्ध पावलेली आहे. जागृती एकविरा देवीचा महिमा फार मोठा आहे. या एकविरा स्थानाबाबत एक आख्यायिका आहे. ती म्हणजे पांडवकाळात पांडवांनी कळंबुसरे परिसरातील इंद्रायणी डोंगरावर एकविरा देवीचे स्थान बसवले. आणि या ठिकाणी एका रात्रीत मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु हे मंदिर या जागी पांडवांना एका रात्रीत बांधता न आल्याने या मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेले दगडी खांब पांडवांनी इंद्रायणी डोंगरावरून फेकून दिले. हे खांब आजही कळंबुसरे कोप्रोली व केळवणे चिरनेर.येथील जंगलात पहावयास मिळतात. हे खांब अंदाजे पाच ते सहा फूट आहेत. मात्र पांडवानी पूजन केलेला एकविरा देवीचा मूळ दगड आजही या स्थानावर उपलब्ध आहे .याशिवाय स्थानाजवळच असलेल्या एका मोठ्या कातळावर पांडवकालीन पायाचे ठसे उमटलेले दिसत आहेत. कळंबुसरे परिसरातील इंद्रायणी डोंगरावर एकविरा देवीचे स्वयंभू मूळस्थान आहे. देवी एकविरा श्री विष्णूचा सहावा अवतार आहे. श्री परशुराम यांची माता जमदग्नी ऋषींची पत्नी! साक्षात रेणुका मातेचे एक रूप म्हणजे एकविरा आई.
देवळाच्या सभोवलतालच्या परिसराला निसर्गही सिद्धहस्त वंदन करत आहे. उंच डोंगर, घनदाट झाडी व पावसाळ्यात पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण, असे निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. परंतु डोंगर चढून जाताना उंच डोंगरावरून दिसणारा निसर्ग रम्य परिसर मन मोहून घेतो. या एकविरा मातेच्या स्थानाच्या आजूबाजूला पाहिले असता, अगदी रम्य परिसर, खोल कडे चित्र विचित्र घळी पहावयास मिळतात. तर या उंच डोंगरावरून पश्चिमेकडे पाहिले असता अरबी समुद्र व मुंबईचे दर्शन होते. नवसाला पावणारी आगरी कोळ्यांचे आराध्य दैवत म्हणून एकविरा देवीला हिंदसमाजात वेगळेच स्थान आहे. या एकवीरा देवीच्या स्थानावर अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र उत्सव तसेच चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा व पालखी निघते. गुराख्यांची एकविरा माता म्हणून ती आजही प्रसिद्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत