मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय तसेच सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हा कथित प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित व्हिडिओमध्ये ट्रान्सवूमन पवन यादव यांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून, हा व्हिडिओ पवन यादव यांचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, पवन यादव यांच्यावर याआधी मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणीसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
या घटनेनंतर शासकीय निवासस्थानाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी शासकीय सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे,” अशी टीका केली. तसेच, “जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट पाळावी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करून नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत