Contact Banner

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; महादेव हॉस्पिटलमध्ये परिसंवाद संपन्न

 


जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; महादेव हॉस्पिटलमध्ये परिसंवाद संपन्न

लेवाजगत न्यूज जळगाव :- शहरातील महादेव हॉस्पिटल येथे गुरुवार, दि. १२ मार्च रोजी ‘सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस’ या गंभीर व जुनाट आजारावर विशेष परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संधिवात तज्ज्ञ डॉ. आस्था अग्रवाल आणि ग्रंथीशास्त्र तज्ज्ञ डॉ. चिमु चिंते यांनी उपस्थितांना या आजाराचे स्वरूप, लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.


हे पण बघा -शास्त्री भक्ती प्रकाश दासजी यांचे श्री आदिशक्ती मुक्ताबाई " फिरता नारळी सप्ताहास उपस्थितीचे आवाहन

👇

https://youtube.com/shorts/___NhRe5DQk?feature=share

परिसंवादात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी सांगितले की, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस हा एक ‘ऑटोइम्यून’ प्रकारचा आजार आहे. या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. म्हणजेच शरीराची सुरक्षा यंत्रणा स्वतःच्याच अवयवांना शत्रू समजून त्यांच्यावर आक्रमण करते. हा आजार ‘सिस्टेमिक’ स्वरूपाचा असल्याने त्वचा, सांधे, किडनी, हृदय तसेच मेंदू अशा शरीराच्या विविध अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांनी ल्युपस ओळखण्यासाठी काही महत्त्वाची लक्षणेही सांगितली. नाकाच्या पुलावर आणि दोन्ही गालांवर फुलपाखराच्या आकाराचा लाल पुरळ दिसणे, सांध्यांमध्ये सूज येणे आणि सकाळी उठल्यावर सांधे जखडल्यासारखे वाटणे, सतत थकवा जाणवणे, वारंवार ताप येणे, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर पुरळ येणे तसेच थंडीमुळे हातापायांच्या बोटांचा रंग पांढरा किंवा निळसर होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

ल्युपस आजाराची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नसली तरी अनुवांशिकता हे एक प्रमुख कारण मानले जाते. विशेष म्हणजे या आजाराचे सुमारे ९० टक्के रुग्ण स्त्रिया असतात. यामागे ‘इस्ट्रोजेन’ या हार्मोनचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. याशिवाय अतिनील किरणांचा संपर्क, संसर्ग किंवा काही औषधांमुळे हा आजार बळावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज ल्युपससारख्या आजारावर केवळ लक्षणे कमी करण्यापुरते उपचार मर्यादित न राहता आजार नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास डॉ. सी. ए. कांते, डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. रविंद्र पाटील, डॉ. तेजस खैरनार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. ऋषभ पाटील, डॉ. ललित कुमार, डॉ. स्वानंद झंवर, डॉ. रोहित कोळी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.