कोल्हापूरात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळ-गारपिटीमुळे नुकसान
कोल्हापूरात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळ-गारपिटीमुळे नुकसान
लेवाजगत न्यूज कोल्हापूर : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी निसर्गाने अचानक वेगळेच रूप धारण केले. दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील कापसी खोऱ्यात पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केले. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या गारांच्या वर्षावामुळे अनेक घरांवरील कौले उडून गेली, तर काही घरांच्या काचा फुटल्याच्या घटना घडल्या. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, तसेच पत्र्याचे शेडही हवेत उडून गेल्याचे पाहायला मिळाले. या वादळामुळे काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसह सोलापूरमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. मात्र कोल्हापूरमध्ये चित्र पूर्णपणे उलट दिसून आले. दिवसभर घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना संध्याकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने चिंब भिजवले. ढगांच्या कडकडाटासह विजांच्या लखलखाटामुळे कोल्हापूरचे आकाश उजळून निघाले. दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी पाऊस अशा परिस्थितीत कोल्हापूरकरांनी एकाच दिवसात दोन ऋतूंचा अनुभव घेतला.
दरम्यान, वातावरणातील अचानक झालेला बदल लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता तातडीचा इशारा जारी केला. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा तसेच झाडांखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत