Contact Banner

ज्येष्ठ साहित्यिक ए. डी. पाटलांनी साहित्याचा जागर मांडला आहे:-साहित्यरत्न एल बी पाटील

 

jyestha-sahityik-a-d-patil-yanni-sahityacha-jagar-mandla-sahityaratna-lb-patil


ज्येष्ठ साहित्यिक ए. डी. पाटलांनी साहित्याचा जागर मांडला आहे:-साहित्यरत्न एल बी पाटील


उरण : सुनिल ठाकूर -

 ज्येष्ठ साहित्यिक ए डी पाटील यांनी साहित्याचा जागर मांडला आहे. असे महत्त्वपूर्ण विचार साहित्यरत्न प्रा. एल बी पाटील यांनी मांडले. ज्येष्ठ साहित्यिक ए डी पाटील यांच्या लेखणीतून उतरलेल्या मला भावलेली  व्यक्तिमत्वे व  सारडे गाव आणि त्याचा भवताल या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 22) रोजी  पिरकोन (उरण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते आपल्या भाषणातून बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्रिदल एज्युकेशन सोसायटी व सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी भूषविले होते. तर प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ साहित्यिका स्मिता  वाजेकर, चेअरमन जीवन गावंड, कादंबरीकार चंद्रकांत मढवी, साहित्यिक सुधाकर पाटील, अँड. के एस पाटील, इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक प्रकाश पाटील, इतिहास संशोधक के एम मढवी, खजिनदार प्रफुल्ल वेदक, उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील तसेच अन्य साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. यापुढे बोलताना पाटील यांनी ए डी पाटलांच्या साहित्याला इथल्या मातीतल्या समाजाच्या प्रश्नांचा गंध आहे. त्यांचे साहित्य ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याचे पवित्र काम करताना दिसून येत आहे. समाजाचे प्रश्न मांडणारे त्यांचे हे  ग्रामीण साहित्य लोकजीवनाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण साधन असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. तर प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी साहित्यिक

ए डी पाटलांची साहित्य चळवळ प्रेरणा देणारी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाचे खरे वास्तव मांडले असून, आपल्या पत्रावळ  कादंबरीतून हलाखीच्या परिस्थितीत पत्रावळीच्या व्यवसायातून वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा केला. याचे वास्तव आपल्या पत्रावळ कादंबरीतून मांडले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.


 दरम्यान ज्येष्ठ साहित्यिका स्मिता वाजेकर यांनी पुस्तक परीक्षणातून मला भावलेली व्यक्तिमत्वे हे  पुस्तक तालुक्यातील उतुंग व्यक्तिमत्त्वांसाठी  मानाचे कोंदण व्हावे या तळमळीने ए डी पाटील यांनी या पुस्तकाची निर्मिती केली असून, येथील व्यक्तिमत्वांना एक नवे नाव मिळाले. एक वेगळी प्रतिष्ठा या पुस्तकाच्या माध्यमातून मिळाली. हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.


  लेखक ए डी पाटील यांचे मनोगत 


मी साहित्याचा नम्र उपासक आहे. साहित्य हे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. वैचारिक वादविवाद सोडता साहित्यात मी कोणाची उंची बघितली नाही.  माझा साहित्य प्रवास सतत प्रवाहित राहावा, यासाठी वारंवार प्रोत्साहन देणारी माझी पत्नी भारती पाटील हिचे देखील मला आभार मानावे लागतील.


 प्रसिद्ध निवेदिका रंजना केणी यांच्या उत्स्फूर्त व खुमासदार सूत्रसंचालनातून साहित्यिक रसिकांनी कार्यक्रम अनुभवला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद उरण व काव्य दरबार उरण यांच्यावतीने सत्कारमूर्ती तथा ज्येष्ठ लेखक ए डी पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल वेदक, मुख्याध्यापिका ए ए पाटील, निमंत्रक बी के भगत, एल एन भगत, सी के पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, संजीव पाटील, समता ठाकूर, मीनल माळी, लवेंद्र मोकल व शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी  विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.