Contact Banner

सावदा पालिका सर्वसाधारण सभेत २७ विषयांना मंजुरी; मागासवर्गीय समाजाच्या मुद्द्यावरून व नाल्याचा प्रवाह थांबवून लेआउट एनए प्रकरणावरून वादळी चर्चा

savda-sarvasadharan-sabhet-27-vishyan-na-manjuri-magasvargiya-muddavar-ani-nalya-pravah-thambavun-layout-na-prakaranavar-vadali-charcha


सावदा पालिका  सर्वसाधारण सभेत २७ विषयांना मंजुरी; मागासवर्गीय समाजाच्या मुद्द्यावरून व  नाल्याचा प्रवाह थांबवून लेआउट एनए प्रकरणावरून वादळी चर्चा

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : सावदा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण, मुख्याधिकारी भूषण वर्मा तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेत एकूण २७ विषयांवर चर्चा करून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शहरातील दिव्यांग बांधवांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील दिव्यांग अनुदान वितरित करण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांच्या जन्मनियंत्रण (ABC) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत चर्चा झाली. तसेच शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई, स्वामीनारायण नगर परिसरातील शिव-हनुमान मंदिराजवळ लग्न समारंभात वाजणाऱ्या बँड व डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे, नगरपरिषद क्षेत्रात नवीन उद्यान विकसित करणे, स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी उभारणे आदी विषयांनाही सभेत मंजुरी देण्यात आली.

तसेच शहरातील नवीन गटारी बांधकाम, जुन्या गटारींची दुरुस्ती, झाकण बसविणे, विविध इमारतींच्या किरकोळ दुरुस्ती कामांसाठी वार्षिक निविदा काढणे, नगरपरिषद संचलित उर्दू माध्यम शाळेसाठी शौचालय व पाण्याच्या टाकीचे बांधकाम, तसेच विविध भागात संरक्षण भिंती व इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यासही मान्यता देण्यात आली.

दरम्यान सभेदरम्यान मागासवर्गीय समाजाशी संबंधित एकही विषय इतिवृत्तात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी आक्षेप नोंदविला. यावेळी नगरसेवक विशाल तायडे तसेच त्यांच्या सहकारी नगरसेवकांनीही नगराध्यक्षांना जाब विचारला. या मुद्द्यावरून काही काळ सभागृहात खडाजंगी झाली.

याचवेळी शहराच्या हद्दीत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवून बनावट मोजणी शीट दाखवत एका लेआउटला एनए (नॉन-अॅग्रीकल्चरल) मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही सभेत करण्यात आला. या प्रकरणावरून सभागृहात वादळी चर्चा रंगली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित करताच सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही त्यांना साथ दिल्याने वातावरण अधिक तापले.

यावेळी राजेश वानखेडे यांनी नगरसेवक प्रश्न विचारत असताना त्यांना पूर्ण बोलू द्यावे, मध्ये कोणी हस्तक्षेप करू नये तसेच कोणत्याही नगरसेवकाकडे बोट दाखवून बोलू नये, असे स्पष्टपणे सभागृहात निदर्शनास आणून दिले. या चर्चेदरम्यान कामांमधील टक्केवारीचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला.

तथापि, चर्चेनंतर सभेतील सर्व २७ विषयांना अखेरीस मंजुरी देण्यात आली आणि शहरातील विविध विकासकामांना हिरवा कंदील मिळाला.

चर्चेमध्ये विषय मंजुरीसाठी सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.