Contact Banner

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील




 शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील

राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात शेतकरी व ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत माजी खासदार Dr. Ulhas Patil डॉ उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.

या अर्थसंकल्पात सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शेती व्यवसायाला नव्याने उभारी मिळण्यास मदत होणार आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले होते. अशा परिस्थितीत राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

तसेच शेती अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व फायदेशीर व्हावी यासाठी राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना “महाविस्तार” या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज, कीड व रोग नियंत्रण, तसेच बाजारपेठेतील भावांची ताजी माहिती त्वरित मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतील व शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

याशिवाय Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana मध्ये शेतमजुरांचाही समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनाही अपघाताच्या प्रसंगी आर्थिक संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार वर्गासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी नमूद केले.

राज्य सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. शेती क्षेत्राला बळ देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा असून ग्रामीण विकासाचे स्पष्ट प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.