टेक्नॉलॉजी आणि टॅलेंटची जुगलबंदी! महावितरणच्या अनिता चौधरी यांचा ‘श्री दामाजीपंत कलाभूषण’ पुरस्काराने गौरव
टेक्नॉलॉजी आणि टॅलेंटची जुगलबंदी! महावितरणच्या अनिता चौधरी यांचा ‘श्री दामाजीपंत कलाभूषण’ पुरस्काराने गौरव
मंगळवेढा (जि. सोलापूर) प्रतिनिधी :
कला आणि अभियांत्रिकीचा सुंदर संगम साधत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महावितरणमधील अभियंता सौ. अनिता अमोल चौधरी यांना राज्यस्तरीय ‘श्री संत दामाजीपंत कलाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
ज्ञानक्रांती सामाजिक संस्था, मंगळवेढा (जि. सोलापूर) यांच्या वतीने आयोजित या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अनिता चौधरी यांनी अध्यक्षपद भूषविले, ही विशेष बाब ठरली. कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार श्री समाधान आवताडे यांच्या हस्ते झाले.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक गुणवंतांना अनिता चौधरी यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
महावितरणमध्ये कल्याण चाचणी विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अनिता चौधरी यांनी आपल्या शासकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकीही प्रभावीपणे जपली आहे. जनतेला तत्पर सेवा देतानाच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
त्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण मुंबई विद्यापीठ अंतर्गत वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) येथून पूर्ण केले असून त्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. “Design & Management in Electrical Systems” या विषयात त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
गेल्या २० वर्षांपासून त्यांनी विद्युत उपकरणांची चाचणी, उपकेंद्र संरक्षण प्रणाली तसेच प्रशिक्षक म्हणून मीटरिंग, विद्युत सुरक्षा, ऊर्जा संवर्धन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यापूर्वीही त्यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार (२०२६), राष्ट्रीय कला रत्न पुरस्कार (२०२५), कल्याण भूषण पुरस्कार (२०२४), राष्ट्रीय समाजरत्न भूषण पुरस्कार (२०२४), उत्कृष्ट महिला अभियंता (२०२३) तसेच Best Theft Detection Work Award (२०२३) असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई-वडिलांसह पती श्री. अमोल चौधरी यांना दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तांत्रिक कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची जाणीव यांचा संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत