विधानसभेत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू
विधानसभेत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू
मुक्ताईनगर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानसभेतील कामकाजादरम्यान मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विधानसभेतील कामकाज सुरू असताना आमदार पाटील यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर उपस्थित सदस्य आणि अधिकाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. प्राथमिक उपचारानंतर अधिक तपासणी व उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तेथे वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे नेते तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही रुग्णालयात भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक ते सर्व उपचार करण्यात यावेत, अशा सूचना दिल्या.
आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आमदार पाटील यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सततच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मुक्ताईनगर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत