ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत; भक्तीमय वातावरणात शोभायात्रा
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत; भक्तीमय वातावरणात शोभायात्रा
लेवाजगत न्यूज जळगाव : ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित भगवान श्री परशुराम पालखी सोहळा जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पालखीचे घरोघरी पूजन करत नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. टाळ, मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
निवृत्ती नगरातील श्री हनुमान मंदिरातून सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. टाळ-मृदंग, ढोल-ताशे आणि लेझीम नृत्याच्या सादरीकरणासह “भगवान परशुरामाचा जयजयकार” करत ही पालखी मिरवणूक एसएमआयटी कॉलेजमार्गे प्रेमनगर येथील श्री सप्तश्रुंगी मंदिरात दाखल झाली. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन करून भव्य स्वागत केले.
या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे प.पू. श्री दादा महाराज जोशी, जळगाव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख प.पू. श्री देवेंद्र गढीकर गुरुजी, हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी, शिवसेना जिल्हा उपसंघटक तसेच ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ. अर्चना सुरडकर, भाजपा स्वीकृत नगरसेवक सुभाष शौचे, ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्षा रेखाताई कुळकर्णी, अजय कुळकर्णी, पालखी प्रमुख प्रसाद पटवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री सप्तश्रुंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प.पू. श्री दादा महाराज जोशी यांनी ब्राह्मण समाज हा समाजाचा आदर्श असून संस्कार, ज्ञान, विनम्रता आणि सेवाभाव जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. सनातन धर्माचे पालन करून समाज एकसंघ आणि सशक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर सौ. अर्चना सुरडकर यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली. “मुलींनी आता भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध लढा द्यावा,” असे सांगत त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. तसेच पालकांनी मुलांवर संस्कार करण्यास प्राधान्य द्यावे, पैशासोबतच संस्कार आणि प्रतिष्ठाही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी नवनिर्वाचित उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक सुभाष शौचे यांचा सत्कार करण्यात आला. वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी रामरक्षा पठण करून वातावरण अधिकच भक्तिमय केले.
मिरवणुकीपूर्वी जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे श्री. ईश्वर दीक्षित व सौ. दीक्षित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी नंदू शुक्ल गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्मश्री संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच ह.भ.प. मंगेश महाराज, श्रीराम महाराज, संजय दीक्षित, फडे गुरुजी, प्रसाद जोशी, कमलाकर फडणीस, निलेश राव, दीपक महाजन आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत