Contact Banner

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

brain-injury-young-man-successful-surgery-dr-ulhas-patil-hospital-neuro-specialists


मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

लेवाजगत न्यूज जळगाव : भुसावळ येथील २३ वर्षीय तरुणावर डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. या जटिल शस्त्रक्रियेमुळे तरुणाची प्रकृती आता स्थिर असून तो हळूहळू बरा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सुमित गजानन पवार हा २३ वर्षीय तरूण भुसावळ येथील रहिवासी असून तो आपल्या कंपनीत कामावर जात असताना त्याची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर त्याच्या शरीराची हालचाल मंदावली होती तसेच हात-पायांची ताकदही कमी झाली होती. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांच्या टीमने तत्काळ रुग्णाची तपासणी सुरू केली. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेता तातडीने सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये रुग्णाला लेफ्ट पेरिएटल डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर विथ हिमॅटोमा असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच डोक्याच्या डाव्या बाजूच्या हाडाला खोलवर फ्रॅक्चर होऊन मेंदूमध्ये रक्त साचले होते, ज्यामुळे रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

निदानानंतर तातडीने शस्त्रक्रिया

निदान होताच तज्ज्ञ डॉ. राठोड आणि त्यांच्या टीमने वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. लेफ्ट पेरिएटल क्रेनिओटोमी विथ एक्सीजन ऑफ डिप्रेस्ड पार्ट ऑफ स्कल अ‍ॅन्ड इव्हॅक्युएशन ऑफ हिमॅटोमा या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये डोक्याच्या जखमी भागातील दाबलेले हाड काढून टाकण्यात आले आणि मेंदूमध्ये साचलेले रक्त सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यामुळे रूग्णाच्या शरीराच्या हालचालींमध्ये सुधारणा होत असून हात-पायांची ताकदही हळूहळू वाढत आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश, यांच्यासह आयसीयू विभागातील शालीक चौधरी यांनी रूग्णाच्या देखभालीसाठी सहकार्य केले.

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतींमध्ये ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य वेळी रुग्णाला रुग्णालयात आणल्यामुळे आणि तातडीने तपासणी व शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाले. अशा प्रकारच्या दुखापतींमध्ये विलंब झाला तर मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो किंवा जीवितहानीही होऊ शकते.तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.    

- डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.