लग्नाच्या आठ दिवस आधी काळाचा घाला; देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या नवरीचा अपघातात मृत्यू
![]() |
| मयत-नवरी मुलगी शिखा विनायक बेलसरे |
लग्नाच्या आठ दिवस आधी काळाचा घाला; देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या नवरीचा अपघातात मृत्यू
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यांत साठवून लग्नाच्या तयारीत असलेल्या तरुणीवर नियतीने क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे घडली. देवीचे दर्शन घेऊन परतत असताना झालेल्या भीषण कार अपघातात नवरी मुलगी शिखा विनायक बेलसरे आणि तिची चुलत वहिनी मीना मानकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिखा बेलसरे हिचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता आणि 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. लग्नाची पत्रिका वणी येथील सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी शिखा ही भाऊ शुभम बेलसरे, चुलत भाऊ सुनील मानकर आणि चुलत वहिनीसोबत परतवाडा (जि. अमरावती) येथून स्विफ्ट डिझायर कारने गेली होती.
सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली, ओटी भरली आणि कुटुंबीयांना फोन करून दर्शन झाल्याची माहिती दिल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र महादेवाचे बांबरुड गावाजवळ कारचे टायर अचानक फुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली.
या भीषण अपघातात शिखा बेलसरे आणि मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर आले असताना नवरीचा झालेला अपघाती मृत्यू संपूर्ण कुटुंबासाठी मोठा आघात ठरला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत