धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने ३ किमीपर्यंत मृत्यूशी झुंज
धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने ३ किमीपर्यंत मृत्यूशी झुंज
लेवाजगत न्यूज एरंडोल -धुळ्याहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तब्बल ३ किलोमीटरपर्यंत बस अनियंत्रित अवस्थेत धावत होती. या थरारक प्रसंगामुळे बसमधील ५० ते ६० प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. सुदैवाने बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस पारोळा येथून पुढे निघाल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गावाच्या परिसरात पोहोचताच गाडीच्या मागील बाजूने मोठा ‘खळखळ’ आवाज येऊ लागला. काही क्षणांतच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसचे ब्रेक निकामी झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर बस भरधाव वेगाने कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याखाली जात होती. जवळपास ३ किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. बसमधील प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. अनेकांनी देवाचा धावा सुरू केला होता.
चाके निखळल्याची धक्कादायक माहिती
अपघातादरम्यान बसची काही चाके निखळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अखेर अनियंत्रित बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली आणि मोठा अनर्थ टळला.
या भीषण धडकेत बस चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
जखमींवर उपचार सुरू
अपघातात जखमी झालेल्या १० ते १५ प्रवाशांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश प्रवाशांना मुका मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर एसटी महामंडळाच्या बस देखभाल आणि तांत्रिक तपासणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रवाशांनी बसच्या देखभालीतील हलगर्जीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत