गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण – प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण – प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेच्या प्रेरणास्थान श्रद्धेय स्व. गोदावरी वासुदेव पाटील (आजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच गोदावरी आजींची खरी शिकवण असून ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावी, असा मोलाचा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व कर्मचार्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करत भावपूर्ण अभिवादन केले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात गोदावरी आजींच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करत, अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून त्यांनी उभारलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाज उभारणीसाठी दिलेले त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी आजींच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या सामाजिक व शैक्षणिक वारशावर प्रकाश टाकला. डॉ. सरोज भोळे यांनी त्यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत, त्यांच्या कष्टाळूपणा व दूरदृष्टीमुळे संस्था उंच शिखरावर पोहोचल्याचे सांगितले. प्रा. प्रवीण सोनवणे यांनी गोदावरी फाऊंडेशनच्या कार्याचा संदर्भ देत आजींच्या कार्याची व्यापकता अधोरेखित केली.
या प्रसंगी तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी केले.
यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनीही आदरांजली अर्पण केली.
तसेच गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालय, गोदावरी इंग्लिश स्कूल, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, कृषी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच गोदावरी संगीत महाविद्यालय येथेही गोदावरी आजींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत