स्व. गोदावरी आई जयंतीनिमित्त शिबिरातून चिमुकल्यांना दृष्टीची नवी आशा
स्व. गोदावरी आई जयंतीनिमित्त शिबिरातून चिमुकल्यांना दृष्टीची नवी आशा
जळगाव : स्व. गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे तिरळेपणा दुरुस्ती व पडलेल्या पापणीवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला बुधवारपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून अनेक चिमुकल्या रुग्णांना नव्याने दृष्टी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दि. ३ ते ५ एप्रिल दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, १ व २ एप्रिल रोजी रुग्णांची तपासणी सुरू आहे. या शिबिरासाठी आतापर्यंत १३५ रुग्णांनी नोंदणी केली असून पहिल्या दिवशी ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. उर्वरित रुग्णांची तपासणी उद्या करण्यात येणार आहे.
या शिबिरात पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर हे शस्त्रक्रिया करणार असून त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये १९८ शिबिरे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यांच्या सोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ३ एप्रिल रोजी जळगावात दाखल होणार असून, शस्त्रक्रियेची गरज असलेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
शिबिराच्या प्रारंभी स्व. गोदावरी आई यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय संचालक व नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. रेणुका पाटील यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर चिमुकल्या रुग्णांना बिस्कीट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, ज्या रुग्णांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्या तपासणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत