गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
जळगाव लेवाजगत न्यु प्रतिनिधी
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लोकसेवेविषयी जागरूकता निर्माण करणे, शासनाच्या सेवांबाबत माहिती देणे तसेच जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे (ई अँड टीसी) तसेच प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. नकुल गाडगे यांनी ‘लोकसेवा हक्क दिना’निमित्त शपथग्रहण कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी भाषणे सादर केली. निधी बैसाने, दिया चौधरी आणि जिज्ञासा पाटील या विद्यार्थिनींनी सार्वजनिक सेवांचे महत्त्व, प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल सेवा, नागरिकांची जबाबदारी तसेच युवकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका यांवर विचार मांडले.
अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकसेवा हक्क दिनाचे महत्त्व स्पष्ट करत शासनाच्या सेवा नागरिकांना ठराविक कालमर्यादेत, पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने मिळणे हा या कायद्यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता समाजव्यवस्था, शासन यंत्रणा, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भविष्यातील अभियंते, प्रशासक आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यदक्षता आणि समाजसेवा ही मूल्ये आत्मसात करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी चोपडे यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय प्रा. नकुल गाडगे यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या पार पाडले.
कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात उत्साह, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकशाही मूल्यांची समज आणि सार्वजनिक व्यवस्थेविषयी आदर निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत