Contact Banner

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या हेमांगी शिंपीच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेतून दीड लाखांची मदत


hemangi-shimpi-snake-bite-victim-family-gets-rajiv-gandhi-sanugrah-grant-kasoda-news


सर्पदंशाने मृत्यू झालेल्या हेमांगी शिंपीच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेतून दीड लाखांची मदत

कासोदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : येथील क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीत शिकणारी हेमांगी संजय शिंपी हिचा २७ मे २०२५ रोजी विषारी सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या पाठपुराव्यानंतर तिच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून दीड लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

हेमांगी शिंपी ही कासोदा येथील पांडे नगर परिसरातील रहिवासी होती. रात्रीच्या वेळी तिला विषारी सर्पदंश झाला. सुरुवातीला कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली नाही. मात्र प्रकृती खालावत गेल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अत्यंत गरीब कुटुंबातील हेमांगी ही अभ्यासात हुशार असून आई-वडिलांना घरकामात मदत करणारी समजूतदार मुलगी होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

या घटनेनंतर क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. बोरसे, वर्गशिक्षक प्रकाश राठोड आणि लिपिक गोपाल पाटील यांनी सानुग्रह अनुदानासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. एरंडोलचे शिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनीही या प्रक्रियेत सहकार्य केले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी हेमांगीच्या वडिलांच्या खात्यात दीड लाख रुपयांची मदत जमा झाल्याची माहिती मुख्याध्यापक बोरसे यांनी दिली.

शासनाच्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होऊन त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हेमांगी परत येणार नसली तरी मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. एरंडोल तालुक्यातील या प्रकारातील लाभ मिळालेली ती एकमेव विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात आले. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पालकांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.