कंडारी येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
कंडारी येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
कंडारी (ता. जळगाव) : हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कंडारी येथील आरोग्य उपकेंद्र व कार्यक्षेत्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “Driven to end malaria, now we can, now we must” (हिवताप निर्मूलनासाठी आपण सक्षम आहोत — आता आपण कृती केलीच पाहिजे) या घोषवाक्याद्वारे नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव व डॉ. अजय पाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिवताप हा डासांद्वारे पसरणारा आजार असून, वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी गावपातळीवर कंटेनर सर्वेक्षण, ताप रुग्णांची तपासणी, रक्त तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
हिवताप प्रतिबंधासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करणे, डास प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे तसेच ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घेणे, असे महत्त्वाचे संदेश आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके यांनी नागरिकांना दिले.
या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिरीन कमलाकर पाटील तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत