पिंपळे सौदागर येथे खान्देश महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात संपन्न
पिंपळे सौदागर येथे खान्देश महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात संपन्न
खान्देश महोत्सवास २० हजार नागरिकांची उपस्थिती
लेवाजगत न्यूज पुणे : पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन परिसरात ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला खान्देश महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. लेवा क्वीन्स व लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हरवत चाललेली पारंपरिक संस्कृती, नात्यांतील आपुलकी आणि खाद्यसंस्कृती जपण्याचा उद्देश या महोत्सवामागे होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला सुमारे २० हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली.
महोत्सवात एकूण ५१ स्टॉल्स उभारण्यात आले होते. खान्देशी खाद्यपदार्थांसोबतच पारंपरिक व आधुनिक वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. देवगड हापूस आंबा, झणझणीत शेवभाजी, वरण-बट्टी, फुनके कढी, उडदाचे वडे, गव्हाची खीर, खापरावरची पुरणपोळी यांसारख्या खान्देशी पदार्थांनी रसिकांची मने जिंकली.
याशिवाय उन्हाळी वाळवण, ऑर्गॅनिक उत्पादने, क्रोशे व इमिटेशन ज्वेलरी, साड्या, हँडक्राफ्ट वस्तू आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. स्टॉलधारकांचा प्रतिसादही अत्यंत समाधानकारक होता.
महोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार शंकरशेठ जगताप व विजूशेठ जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून महोत्सवाची शोभा वाढवली.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर जिमनॅस्टिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या कु. प्रिशा महाजन हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक सौ. शरयू खाचणे, सौ. सीमा तळेले, वैशाली चौधरी, सौ. कविता पाटील, श्री. आदित्य कोलते तसेच लेवा भ्रातृमंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत