उरणमध्ये ‘रंगोत्सव २०२६’चा दिमाखदार समारोप; कलेतून बालमनाला नवी दिशा
उरणमध्ये ‘रंगोत्सव २०२६’चा दिमाखदार समारोप; कलेतून बालमनाला नवी दिशा
उरण : सुनिल ठाकूर-
‘योशिता आर्ट’ आणि ‘मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय ‘रंगोत्सव २०२६’ कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळेचा समारोप जेएनपीए स्टाफ क्लब येथे भव्य कला प्रदर्शनाने उत्साहात पार पडला. या प्रदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक चित्रांनी उपस्थितांचे मन जिंकले, तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, आजच्या मोबाईल-केंद्रित जगात मुले आभासी विश्वात गुरफटत चालली आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होत असून मानसिक तणावही वाढतो आहे. “विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना मानसिक बळ देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा ‘रंगोत्सव’चा मुख्य हेतू आहे,” असे त्यांनी नमूद केले.
गुणवंतांचा सन्मान
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते दोन गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार—
- कुमारी हिताक्षी मुकुंद ठाकूर : सीबीएसई दहावी परीक्षेत ९५.६% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन.
- कुमारी सलोनी सचिन कडू : एमबीए आणि सीए पदवी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण.
या दोघींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. हा क्षण पालकांसाठी अभिमानास्पद आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास पत्रकार सुनील ठाकूर, सौ. तृप्ती भोईर, शिक्षक नेते रमाकांत गावंड, मुख्याध्यापक अंकुश जोगळे यांच्यासह एकनाथ घरत, सचिन कडू, अविनाश म्हात्रे, किशोर कडू, बळीराम घरत आणि भूपेंद्र डाकी यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कलेचा उत्सव, प्रेरणेचा संदेश
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविधरंगी कॅनव्हास कलाकृती पाहून पालक आणि रसिक प्रेक्षक भारावून गेले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम उरण परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून, कलेच्या माध्यमातून नव्या पिढीला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न म्हणून त्याची प्रशंसा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत