दोन दिवसांपासून थकवा; २४ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
दोन दिवसांपासून थकवा; २४ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | शेंदुर्णी (ता. जामनेर)
तरुणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण हा सध्या गंभीर चिंतेचा विषय बनला असून, शेंदुर्णी येथे रविवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली. प्रज्वल सूर्यवंशी (वय २४) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. प्रज्वल हा बजरंग दलाचा प्रसिद्धी प्रमुख तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून परिचित होता.
मित्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्याला सतत थकवा जाणवत होता. मात्र, उन्हामुळे त्रास होत असावा असा त्याचा समज झाला. रविवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तो त्याचे चुलत भाऊ डॉ. राहुल सूर्यवंशी यांच्याकडे गेला. प्रकृतीची गंभीरता लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पाचोरा येथील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
प्रज्वलच्या निधनाने शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या कष्टाने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्यातच प्रज्वल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बातमीतून धडा
तरुणांनी सततचा थकवा, छातीत दुखणे, धाप लागणे किंवा अस्वस्थता याकडे केवळ उन्हाचा किंवा अॅसिडिटीचा त्रास म्हणून दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत