Contact Banner

जळगावच्या तरुण आयटी इंजिनिअरचा जिमनंतर हृदयविकाराने मृत्यू

 

jalgaon-young-it-engineer-dies-heart-attack-after-gym-workout

जळगावच्या तरुण आयटी इंजिनिअरचा जिमनंतर हृदयविकाराने मृत्यू

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी- जळगाव

जळगाव शहरातील गीतानगर परिसरातील मूळ रहिवासी तथा नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाचा जिममधून घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे जळगावसह पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप अशोक इंगळे (वय ३३) हे पुणे येथील कंपनीत कार्यरत होते. गेल्या दहा वर्षांपासून ते पुण्यातील रावेत परिसरात राहत होते. शनिवारी नेहमीप्रमाणे ते जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. व्यायाम करून घरी परतल्यानंतर रात्री सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक उलटी झाली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

दिलीप इंगळे यांचे प्राथमिक शिक्षण भुसावळ येथे झाले होते. त्यांचा विवाह गेल्या वर्षी ७ मे २०२५ रोजी झाला होता. त्यांच्या पत्नी गर्भवती असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह जळगाव येथे आणण्यात आला असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात सुप्रीम कंपनीतून निवृत्त झालेले वडील अशोक इंगळे, आई, मोठे भाऊ हेमंत व गणेश, तसेच पत्नी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.