Contact Banner

अटक न करण्यासाठी ३० हजारांची लाच; भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्याचे आमिष; खासगी पंटरसह रंगेहात कारवाई

 

30-thousand-bribe-to-avoid-arrest-bhusawal-psi-trapped-by-acb

अटक न करण्यासाठी ३० हजारांची लाच; भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्याचे आमिष; खासगी पंटरसह रंगेहात कारवाई

लेवाजगत न्यूज भुसावळ-।एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) आणि त्याच्या खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. राजू सांगळे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, सलीम हकीम कुरेशी असे पंटरचे नाव आहे. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील तक्रारदाराला संबंधित गुन्ह्यात अटक न करता, केवळ प्रतिबंधात्मक (चॅप्टर) कारवाई करून सोडून देण्यासाठी पीएसआय राजू सांगळे यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी (२९ मे) दुपारी सुमारे ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, पीएसआय सांगळे यांनी त्यांचा खासगी पंटर सलीम हकीम कुरेशी याच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधून तडजोड केली आणि लाचेची रक्कम ३० हजारांवरून २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे, पंटर सलीम कुरेशी याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला जागीच ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही रक्कम पीएसआय राजू सांगळे यांच्या सांगण्यावरूनच मागितल्याची कबुली दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत पीएसआय राजू सांगळे यांनाही अटक केली.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीच्या या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.