सावदा येथील जगमाता परिसरातील महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
सावदा येथिल जगमाता परिसरातील महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
लेवाजगत न्यूज सावदा : शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या जगमाता परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिक व महिलांनी आज सावदा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले.
यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिकेचे लक्ष वेधले. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबांकडे मोटारपंप नसल्याने त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची व्यथा महिलांनी मांडली.
मोर्चादरम्यान नागरिकांनी नगराध्यक्षा तसेच उपनगराध्यक्ष यांना निवेदन देऊन तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त पाणीटँकरची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत