कोचुर खुर्द ग्रामपंचायतीविरोधात दलित वस्तीतील नागरिकांचा संताप ग्रामसेवकांच्या वर्तनावर गंभीर आरोप; विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
कोचुर खुर्द ग्रामपंचायतीविरोधात दलित वस्तीतील नागरिकांचा संताप
ग्रामसेवकांच्या वर्तनावर गंभीर आरोप; विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
लेवाजगत न्यूज सावदा-ग्रुप ग्रामपंचायत कोचुर खुर्द अंतर्गत येणाऱ्या दलित वस्तीमध्ये मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य दलित वस्तीतील कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील इतर भागांमध्ये विविध विकासकामे केली जात असताना दलित वस्तीमध्ये मात्र आमदार निधी किंवा खासदार निधीतून एकही काम करण्यात आलेले नाही. रस्ते, गटारी, वीज खांबांवरीील लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांचीही मोठी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी ग्रामपंचायतीत जाऊन वारंवार कामांची मागणी केली असता, त्यांच्याशी उद्धट व अपमानास्पद भाषेत बोलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काम करा” अशी मागणी केल्यावरही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
यासोबतच ग्रामसेवकांच्या वर्तनाबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. ग्रामसेवक नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत असून, काहींशी वाद घालत चप्पल व मोबाईल फेकून मारल्याचाही आरोप करण्यात आला आहे ?.“तुम्ही सरकारी कर्मचारी आहात की गुंडगिरी करण्यासाठी ग्रामसेवक झाला आहात?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दलित वस्तीतील नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करून प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत