तोल गेल्याने रोटरमध्ये सापडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू; येत्या १८ जूनला होते लग्न
तोल गेल्याने रोटरमध्ये सापडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू; येत्या १८ जूनला होते लग्न
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी यावल-
तालुक्यातील मोहराळा शिवारात शनिवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात दहिगाव येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी योगेश यशवंत पाटील यांचा रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, येत्या १८ जून रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे शनिवारी मोहराळा शिवारातील शोभराज महाजन यांच्या शेतात स्वतःच्या ट्रॅक्टरने रोटर करण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चालवत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते ट्रॅक्टरवरून खाली पडले. काही क्षणांतच ते सुरू असलेल्या रोटरमध्ये सापडल्याने गंभीर जखमी झाले.
अपघातानंतरही ट्रॅक्टर सुरूच राहिल्याने ते सरळ शेजारील शेतात जाऊन पोहोचले. ही धक्कादायक घटना जवळच निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने पाहिली. त्याने तातडीने धाव घेत ट्रॅक्टर बंद केले आणि योगेश यांच्या वडिलांना घटनेची माहिती दिली.
यानंतर योगेश यांचे वडील व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
राजेंद्र पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे आणि राजेंद्र पवार करत आहेत.
मृत योगेश पाटील हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न आणि त्याआधीच झालेला हा दुर्दैवी मृत्यू यामुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत