भुसावळ ते रावेर बसप्रवासात महिलेचे २६ तोळे सोने चोरी; दोन संशयितांवर पोलिसांचा संशय
भुसावळ ते रावेर बसप्रवासात महिलेचे २६ तोळे सोने चोरी; दोन संशयितांवर पोलिसांचा संशय
लेवाजगत न्यूज भुसावळ : भुसावळ ते रावेर दरम्यान बसप्रवास करत असताना एका महिलेच्या बॅगेतील तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा सुरेश गोराडकर (रा. श्रीराम नगर, भुसावळ, सध्या पुणे) या आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी भुसावळ येथे आल्या होत्या. २ मे रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता त्या भुसावळ बसस्थानकावरून रावेरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसल्या होत्या. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग दोन अनोळखी व्यक्तींकडे काही वेळासाठी दिली होती. संबंधितांनी ती बॅग चालकाजवळ ठेवली होती.
रावेर येथे पोहोचल्यानंतर बॅग परत मिळाली. मात्र, त्यावेळी बॅगेतील दागिन्यांची खात्री करण्यात आली नाही. नंतर बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यातील सर्व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये बांगड्या, पाटल्या, नेकलेस, पोत, हार, अंगठ्या तसेच कानातील दागिन्यांचा समावेश असून त्यांचे एकूण वजन सुमारे २६ तोळे असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या बाजारमूल्यानुसार या दागिन्यांची किंमत अंदाजे ३९ लाख रुपये असून, जुने दागिने असल्याने त्यांची मूळ किंमत सुमारे ६ लाख ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी भुसावळ, फैजपूर, सावदा आणि रावेर येथील बसस्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती आढळून आल्याची माहिती असून, त्यापैकी एक संशयित फैजपूर तर दुसरा रावेर येथे बसमधून उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत