Contact Banner

कोचुर खुर्द येथील सरपंच ज्योती कोळी दुसऱ्यांदा अपात्र


kochur-khurd-sarpanch-jyoti-koli-disqualified-second-time


कोचुर खुर्द येथील सरपंच ज्योती कोळी दुसऱ्यांदा अपात्र

रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष कोळी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी पुन्हा एकदा अपात्र घोषित केले आहे.

ज्योती कोळी या अनुसूचित जमाती (एसटी) राखीव जागेवरून निवडून आल्या होत्या. मात्र, निवडीनंतर निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे यापूर्वी त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

यानंतर शासनाने अपात्र ठरलेल्या काही लोकप्रतिनिधींना दिलासा देत एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव आवश्यक पुराव्यांसह पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी लागू होती.

मात्र, ज्योती कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रस्ताव धुळे येथील जात पडताळणी समितीकडे सादरच केलेला नसल्याची माहिती समितीने ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे यांना लेखी स्वरूपात दिली होती.

त्यानंतर “जात वैधता प्रस्तावच सादर नसताना सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा मुद्दा उपस्थित करत सदस्य लिलाबाई तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पुन्हा तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी यांनी सरपंच ज्योती कोळी यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे यांच्या वतीने अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.