भुसावळात तरुणीवर अत्याचार, जबरदस्ती धर्मांतराचा आरोप; संशयित आरोपी अटकेत
भुसावळात तरुणीवर अत्याचार, जबरदस्ती धर्मांतराचा आरोप; संशयित आरोपी अटकेत
भुसावळ | प्रतिनिधी
मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहत असलेल्या २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर सुरुवातीला मध्यप्रदेशातील सिवनी मालवा (जि. नर्मदापूरम) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, संशयित आरोपी नवील शेख (रा. भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणी दहावीच्या शिक्षणासाठी भुसावळ येथे आपल्या आजोबांकडे राहत होती. याच दरम्यान तिची आरोपी नवील शेख याच्याशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. तक्रारीनुसार, दोघांच्या शहरातील एका कॅफेमध्ये काही वेळा भेटीगाठी झाल्या होत्या. त्याच काळात आरोपीने तरुणीचे काही फोटो मोबाईलमध्ये काढले होते.
दरम्यान आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. मात्र धर्म वेगळे असल्याचे सांगत तिने लग्नास नकार दिला होता.
फोटो व्हायरल व कुटुंबीयांना मारण्याची धमकी
पीडितेच्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. ती भेटण्यास तयार नसल्याने आरोपीने कुटुंबीयांना ठार मारण्याची तसेच दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धमक्यांमुळे घाबरलेल्या पीडितेला आरोपीने सुंदरनगर परिसरातील एका खोलीवर नेले. तेथे तिच्यावर तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
जबरदस्ती धर्मांतर व निकाहाचा आरोप
तक्रारीनुसार, ७ मार्च २०२६ रोजी आरोपीने पीडितेला दुसऱ्या दिवशी पहाटे तयार राहण्यास सांगितले. लग्नासाठी सोबत न आल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याने ती आरोपीसोबत गेल्याचे तिने म्हटले आहे.
यानंतर आरोपीने तिला प्रथम सुंदरनगर येथील खोलीवर आणि नंतर दीपनगर परिसरातील एका रूमवर नेले. तेथे काही मौलाना उपस्थित होते. त्यांनी पीडितेला कलमा पठण करण्यास सांगितले. मात्र नकार दिल्यानंतर आरोपीने “कलमा न पढल्यास जिवंत मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जीवाच्या भीतीने आपण कलमा पठण केले आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाजानुसार निकाह पार पडल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
बुरखा घालण्याची सक्ती, मारहाणीचाही आरोप
लग्नविधीनंतर आरोपीने तिला सुंदरनगर येथील खोलीवर सुमारे आठ दिवस ठेवले. या काळात तिच्यावर बुरखा घालण्याची सक्ती करण्यात येत होती. तसे न केल्यास मारहाण केली जात असल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.
दरम्यान, आरएसएस, बजरंग दल आणि कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेची सुटका करण्यात आली. त्यानंतर ती आपल्या मूळ गावी परत गेली.
सिवनी मालवा येथे तक्रार; गुन्हा भुसावळात वर्ग
पीडित तरुणीने १० मे २०२६ रोजी सिवनी मालवा महिला हेल्प डेस्क येथे लेखी तक्रार दिली. त्यानुसार सिवनी मालवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.
या प्रकरणी आरोपी नवील शेख विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२), १२७(३), ३५१(३) आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत