शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी “आपुलकी” उपक्रम; मोफत निवासी शिक्षणाची सुवर्णसंधी
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी “आपुलकी” उपक्रम; मोफत निवासी शिक्षणाची सुवर्णसंधी
लेवाजगत न्यूज जळगाव प्रतिनिधी-
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात येत आहे. मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाला “आपुलकी” असे नाव देण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत पुणे येथील “स्नेहवन” ही सामाजिक संस्था शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत निवासी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आळंदी येथील निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
सन 2015 पासून कार्यरत असलेली स्नेहवन संस्था मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेविषयी अधिक माहिती www.snehwan.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संपर्क क्रमांक 7875501502 असा आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आवाहन केले आहे की, ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी 15 मे पर्यंत करून घ्यावी.
पात्रता निकष :
- विद्यार्थी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असावा.
- प्रवेश इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहील.
इच्छुक व पात्र कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक 0257-2223180 / 0257-2217193 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमास पात्र लाभार्थ्यांनी प्रतिसाद देऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत