डिझेल तुटवड्याने रावेर–यावलचा केळी पट्टा संकटात; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
डिझेल तुटवड्याने रावेर–यावलचा केळी पट्टा संकटात; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लेवाजगत न्यूज जळगाव : रावेर–यावल तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल व इंधन तुटवड्यामुळे केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि वाहतूक व्यवसाय गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप करत च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
रावेर व यावल तालुका हा राज्यातील प्रमुख “केळी पट्टा” म्हणून ओळखला जातो. या भागातील हजारो शेतकरी, मजूर, व्यापारी व वाहतूकदार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे केळी उत्पादन व व्यापारावर अवलंबून आहेत. देशातील विविध बाजारपेठांमध्ये येथून मोठ्या प्रमाणावर केळी पाठविली जात असल्याने स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा महत्त्वाचा आधार मानला जातो.
मात्र, सध्या निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्यामुळे सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी, फवारणी यंत्रणा, ट्रॅक्टर तसेच केळी वाहतुकीची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वेळेवर माल बाजारपेठेत पोहोचत नसल्याने केळी खराब होण्याचा धोका वाढला असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आधीच खत, औषधे, मजुरी आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लावूनही पुरेसे इंधन मिळत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर–यावल तालुक्यात डिझेलचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा, केळी उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे, नियंत्रण कक्ष स्थापन करून परिस्थितीवर लक्ष ठेवावे तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्या स्वाक्षरी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत