ईच्छापुरच्या किशोरचा वेदनादायी मृत्यू; डीजेच्या अतिआवाजामुळे कार्डियाक अरेस्टचा संशय
ईच्छापुरच्या किशोरचा वेदनादायी मृत्यू; डीजेच्या अतिआवाजामुळे कार्डियाक अरेस्टचा संशय
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-ईच्छापुर येथे संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांच्या १७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. किशोर भास्कर भोई (वय ३२) या युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मुक्ताईनगर तालुका भोई समाजाचे अध्यक्ष छोटू भाऊ भोई, शहर प्रमुख प्रवीण भोई, उपाध्यक्ष मनोज भोई, आकाश भोई यांच्यासह अनेक कार्यकर्ते जयंती सोहळ्यासाठी इच्छापुर येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसाद वाटप सुरू असताना किशोर भोई यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. तातडीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र पुढे मुक्ताईनगर येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, किशोर सकाळपासून मोठ्या उत्साहात जयंती उत्सवाच्या तयारीत सहभागी झाले होते. त्यांनी समाजातर्फे तयार करण्यात आलेला टी-शर्ट परिधान केला होता आणि तोच फोटो त्यांनी आपल्या स्टेटसवरही ठेवला होता. कार्यक्रमात मोठा भगवा झेंडा हातात घेऊन ते उत्साहाने सहभागी झाले होते. प्रसाद वाटपही त्यांनी स्वतः केले होते.
मात्र घरी जाऊन परत सभास्थळी येत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि काही क्षणांतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मुक्ताईनगर येथील गोरे हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद गोरे यांनी प्राथमिक माहितीनुसार डीजेच्या अतितीव्र आवाजामुळे कार्डियाक अरेस्ट येऊन मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
किशोर भोई यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. एका आनंदाच्या सोहळ्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भोई समाज हळहळ व्यक्त करत आहे.
आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण आणि अतिआवाज यांचे दुष्परिणाम लक्षात घेणे ही आज काळाची गरज बनली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत