Contact Banner

रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर गोवंश तस्करी; ११ गुरांची सुटका चालक फरार; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 

illegal-cattle-smuggling-through-ambulance-11-cattle-rescued-driver-absconding

रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर गोवंश तस्करी; ११ गुरांची सुटका

चालक फरार; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

लेवाजगत न्यूज | सोनगीर-

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा वापर थेट गोवंश तस्करीसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. सोनगीर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत एका विना क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून निर्दयतेने कोंबून नेण्यात येणाऱ्या ११ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी रुग्णवाहिकेसह सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

माहितीनुसार, २६ मे रोजी पहाटे शिरपूरहून धुळ्याकडे एका रुग्णवाहिकेतून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी तातडीने सोनगीर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल यशवंत महाले आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल तथा चालक युसुफ शेख यांनी सोनगीर टोल नाक्याजवळ सापळा रचून पहारा सुरू केला.

पहाटे साडेसहाच्या सुमारास संशयित रुग्णवाहिका शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने जाताना दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. सरवड फाट्याजवळ पोलिसांची गाडी मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने रुग्णवाहिका रस्त्यावरच सोडून पळ काढला.

पोलिसांनी रुग्णवाहिकेची झडती घेतली असता, आत अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेली ११ गोवंश जनावरे आढळून आली. सर्व जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल यशवंत महाले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनगीर पोलिस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.