Contact Banner

जयाद्री गडावर दरवळला मोगऱ्याचा सुगंध; शेकडो किलो फुलांनी खंडोबा गाभाऱ्याची भव्य सजावट

 

jayadri-gad-mogra-fragrance-khandoba-temple-decoration-with-flowers


जयाद्री गडावर दरवळला मोगऱ्याचा सुगंध; शेकडो किलो फुलांनी खंडोबा गाभाऱ्याची भव्य सजावट

उरण : सुनिल ठाकूर-           

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरावर वैशाख महिन्यानिमित्त रविवारी जय मल्हार मोगरा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरव पुजारी वीर कोळी घडशी मंडळाच्या वतीने शेकडो किलो मोगरा, जाई, जुई, जास्वंद व विविध सुगंधी फुलांनी श्री खंडोबाच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली. या अलौकिक सजावटीमुळे संपूर्ण जयाद्री गड परिसर मोगऱ्याच्या दरवळत्या सुगंधाने भारावून गेला.

पहाटे मंगलमय सनई-चौघड्यांच्या निनादात भूपाळी आरतीने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर मंदिर संस्कृतीचे उपासक गुरव पुजाऱ्यांनी धार्मिक विधीवत पूजा करून मोगऱ्यांची विशेष पुष्पार्चना श्री मल्हारी मार्तंडांना अर्पण केली. शेकडो किलो मोगऱ्यांच्या फुलांनी संपूर्ण गाभारा सजविण्यात आला होता. खंडोबा, म्हाळसादेवी आणि बाणाई देवी यांच्या मूर्तींची शीतल, मनोहारी आणि देखणी सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.

पुरातन काळापासून मोगऱ्याच्या फुलाला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात उन्हाळ्याच्या तीव्रतेत श्री खंडेरायाला शीतलता लाभावी या भावनेतून मोगरा, जाई, जुई आणि पांढऱ्या फुलांनी सजावट करण्याची परंपरा जेजुरी गडावर आजही जपली जाते.

रविवार आणि उन्हाळी सुट्टीचा योग आल्याने जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. त्रिकाळ पूजनानंतर या विलोभनीय मोगरा महोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या. संपूर्ण गाभारा आणि पुढील महाल विविध फुलांच्या मोहक सजावटीने नटल्याने त्याचा सुगंध संपूर्ण जयाद्री परिसरात दरवळत होता.

श्री खंडेरायाचे हे मोगऱ्याच्या शुभ्र फुलांनी सजलेले मनमोहक रूप पाहून भाविकांनी “जय मल्हार”च्या जयघोषात दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.