कासोदा येथे कृषी विभागाची मोठी कारवाई; ४.८० लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त
कासोदा येथे कृषी विभागाची मोठी कारवाई; ४.८० लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त
कासोदा (प्रतिनिधी) : कासोदा येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे बोगस बियाणे तसेच अंदाजे ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बळवंत पाटील हे स्वतःच्या फायद्यासाठी छुप्या पद्धतीने संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार दिनांक ७ रोजी कृषी विभागाने तपासणी केली असता ४५० ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याचे तब्बल ४०० पॉकेट आढळून आले.
याप्रकरणी फिर्यादी निखिल टोळकर यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस स्टेशनमध्ये योगेश बळवंत पाटील (रा. सौंदाणे, ता. जि. धुळे) व नितीन देवरे (रा. वाडीभोकर, ता. जि. धुळे) यांच्याविरोधात कापूस बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कृषी विभागाचे मार्गदर्शक अधिकारी सुनील बोरकर (संचालक, महाराष्ट्र राज्य), सुभाष काटकर (विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक), प्रवीण देशमुख (गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य), कुरबान तडवी (कृषी अधिकारी, जळगाव), पद्मनाभ मस्के (कृषी अधिकारी, जि.प. जळगाव) आणि उल्हास ठाकूर (तंत्र अधिकारी, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत विकास बोरसे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव), निखिल टोळकर (कृषी अधिकारी, एरंडोल), परेश बडगुजर (तालुका कृषी अधिकारी, धरणगाव), सचिन पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी, पिंपळकोठा) तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीकांत पाटील यांच्या पथकाचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत