Contact Banner

निमखेडी रोड वरील उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

 

police-raid-on-brothel-running-in-posh-apartment-nimkhedi-road

निमखेडी रोड वरील उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

महिलेसह पुरुष ताब्यात; दोन पीडित महिलांची सुटका, एएचटीयूची धडक कारवाई


lewajagat.com


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी जळगाव-जळगाव शहरालगतच्या निमखेडी रोड परिसरातील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (एएचटीयू) गुरुवारी रात्री धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडी रोड परिसरातील ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये काही दिवसांपासून अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकासह नियोजनबद्ध सापळा रचला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला (पंटर) संबंधित फ्लॅटमध्ये पाठवले. पंटरने फ्लॅटमध्ये जाऊन तेथील संबंधितांशी पैशांची बोलणी केली. देहव्यापार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाला मिस कॉलद्वारे संकेत दिला. त्यानंतर एएचटीयूच्या पथकाने तत्काळ फ्लॅटवर धाड टाकत कारवाई केली.

छाप्यात फ्लॅटमधून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर काही साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दरम्यान, या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे निमखेडी रोड परिसरात चर्चांना उधाण आले असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.