ऑनलाईन औषध विक्रीविरोधात रावेर तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनचा मूक मोर्चा
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात रावेर तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनचा मूक मोर्चा
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनतर्फे ऑनलाईन औषध विक्रीविरोधात व विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. नवजीवन नगरपालिका हॉस्पिटल येथून सुरू झालेला हा मोर्चा शांततेच्या मार्गाने स्टेशन रोडवरून तहसील कार्यालयात पोहोचला. यावेळी माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चादरम्यान मार्गदर्शन करताना लक्ष्मण सावळे यांनी सांगितले की, जीएसआर ८१७ चे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, दिल्ली हायकोर्टात स्थगिती असलेली ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी तसेच कोरोना काळातील जीएसआर २२० ची अंमलबजावणी रद्द करण्यात यावी.
ते पुढे म्हणाले की, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या डिस्काउंटच्या माध्यमातून छोट्या रिटेल केमिस्ट व्यवसायाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र देशातील लाखो केमिस्ट हा अन्याय सहन करणार नाहीत. प्रत्येक केमिस्ट हा रुग्णसेवेशी जोडलेला असून ही लढाई केवळ केमिस्ट हितासाठी नसून देशातील रुग्णांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे.
ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा १९४० व १९४५ मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसल्याने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष गोविंद महाजन, सचिव प्रवीण सरोदे, खजिनदार लक्ष्मण सावळे, सहसचिव अजय पाटील, उपाध्यक्ष गुणवंत बंगाळे, उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, तेजपाल खाचणे, श्रीधर भोपरीकर, अझर मलिक, धीरज भंगाळे, जितेंद्र जैन, विजय सेठ अग्रवाल, विजय पाटील (निंबोल), दत्तात्रय धांडे (खानापूर) यांच्यासह असंख्य केमिस्ट बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रवीण सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव अजय पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत