Contact Banner

वादळाचा कहर : झाड कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

 

kritika-phegde-scores-96-20-percent-first-rank-jt-mahajan-english-medium-school


storm-havoc-young-man-dies-after-tree-falls-waghoda-nimbhora-road

वादळाचा कहर : झाड कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

लेवाजगत न्यूज मोठे वाघोदा : वाघोदा-निंभोरा रस्त्यावरील शनिमंदिराजवळ तसेच विजय बाजीराव पाटील यांच्या शेतालगत आज दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान आलेल्या भीषण वादळामुळे एक दुर्दैवी घटना घडली. अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड क्षणार्धात कोसळले आणि त्याचवेळी मोटारसायकलवरून जात असलेल्या युवकावर झाड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत शैलेंद्र राजेंद्र मेढे (रा. रोझोदा, ता. रावेर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच १९ ईएन २५१५ असा आहे.

अचानक आलेल्या वादळामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. त्याचदरम्यान झाड कोसळल्याने काही क्षणांतच परिसरावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. झाडाखाली अडकलेल्या शैलेंद्र मेढे यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सावदा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

ही बातमी गावात पसरताच संपूर्ण परिसर हळहळला असून नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून झाड हटविण्याची कार्यवाही सुरू केली. वादळामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

अचानक आलेल्या या भीषण वादळाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून शैलेंद्र मेढे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.