मद्याच्या सवयीतून तरुणाला मिळाले नवजीवन ; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश
मद्याच्या सवयीतून तरुणाला मिळाले नवजीवन ; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश
लेवाजगत न्यूज जळगाव : मद्याच्या अति सेवनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या एका तरुणाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य उपचार व समुपदेशनाच्या माध्यमातून नवजीवन दिल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
धरणगाव तालुक्यातील देवीदास (वय ४७) या तरुणाला दीर्घकाळ मद्यपानाची सवय लागली होती. सतत मद्यसेवन, वागण्यात अचानक बदल, अनियंत्रित बडबड, हातपाय थरथरणे अशा लक्षणांमुळे त्याची मानसिक व शारीरिक स्थिती गंभीर बनली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव व डॉ. राठोड यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. एमआरआयसह विविध वैद्यकीय चाचण्यांनंतर संबंधित तरुणाला ‘अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर’ असल्याचे निदान करण्यात आले.
यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारत औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत बदल यावर विशेष भर दिला. उपचाराच्या सुरुवातीला रुग्णाला अस्वस्थता, चिडचिड आणि झोपेच्या तक्रारी जाणवत होत्या. मात्र डॉक्टरांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.
काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला. हातपाय थरथरणे कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून, तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला आहे.
“मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. कुटुंबीयांचे सहकार्य, रुग्णाची इच्छाशक्ती आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. या यशस्वी उपचारामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.”
–

कोणत्याही टिप्पण्या नाहीत