Contact Banner

भटक्या कुत्र्यांची समस्या; नगरपालिकेची चालढकल असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची टीका; “पालिकेने आधी स्वतःची जबाबदारी पार पाडावी”

 

stray-dog-problem-allegations-against-municipality-delay-umesh-nemade-criticism

भटक्या कुत्र्यांची समस्या; नगरपालिकेची चालढकल असल्याचा आरोप

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची टीका; “पालिकेने आधी स्वतःची जबाबदारी पार पाडावी”

stray-dog-problem-allegations-against-municipality-delay-umesh-nemade-criticism


प्रतिनिधी | भुसावळ

भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवरून नगरपालिकेच्या भूमिकेवर माजी नगराध्यक्ष यांनी गंभीर आरोप केले आहेत. पालिकेने नागरिकांनाच सक्तीच्या सूचना देत स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केला.

शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. घोषित फिडिंग स्पॉट्स, अन्नकचरा कुंड्यांची व्यवस्था किंवा भटके कुत्रे नियंत्रण पथक अस्तित्वात नसताना नागरिकांना नियमांचे डोस पाजले जात असल्याची टीका नेमाडे यांनी केली.

“पालिका देत असलेल्या सूचना या आदेश किंवा धमकीसारख्या वाटतात. स्वतःची जबाबदारी पूर्ण न करता करदाते नागरिकांवर नियम व कायद्याचा बडगा उगारला जात आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक तसेच मूलभूत सुविधा आणि त्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्ययावत ठेवणे ही पालिकेची जबाबदारी असल्याचे सांगत, सध्या नागरिक मोकाट कुत्र्यांच्या भीतीखाली वावरत असताना पालिका आणखी भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागरिकांवर एकतर्फी बंधने लादून कायद्याची भीती दाखवली जात असताना, पालिका मात्र स्वतःच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे नेमाडे यांनी नमूद केले. आवश्यक वाटल्यास या प्रकरणात कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.