५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे यश;
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे यश; स्तनातील गाठ दुर्लक्षित करू नका — तज्ज्ञांचा सल्ला
लेवाजगत न्यूज | जळगाव
गेल्या एक वर्षापासून स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ५५ वर्षीय महिलेवर जळगाव येथील येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या आरोग्याला नवे जीवन दिले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या कौशल्याच्या जोरावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
बर्हाणपूर येथील रशिदा (वय ५५) या महिलेला गेल्या वर्षभरापासून डाव्या स्तनात गाठ जाणवत होती. सुरुवातीला किरकोळ वेदना आणि सूज असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र कालांतराने गाठ वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सक डॉ. वैभव फरके, डॉ. पारितोष ठाकूर, डॉ. अपूर्वा गवई, डॉ. शुभम फावडे आणि डॉ. प्रज्योत कदम यांच्या टीमने महिलेची सखोल तपासणी केली.
आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विविध रक्ततपासण्या, सोनोग्राफी तसेच एफएनएसी तपासणी करण्यात आली. या तपासण्यांच्या अहवालांवरून स्तनातील गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘मोडीफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी’ या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनुभवी डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पाडली. ऑपरेशनदरम्यान स्तनातील गाठ तसेच आवश्यक ऊतक सुरक्षितपणे काढून टाकण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
“स्तनातील गाठीकडे महिलांनी कधीही दुर्लक्ष करू नये. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर उपचार अधिक प्रभावी ठरतात. या रुग्णामध्ये विविध तपासण्यांद्वारे आजाराचे अचूक निदान करून ‘मोडीफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी’ पद्धतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.”
—— डॉ. शुभम फावडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत